• भाजप विरुद्ध भारतीय मोहीमेची बैठक संपन्न

    मुंबई : देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच्या अप्पलपोट्या
    कारभारामुळे बुरे दिनांचा सामना करणार्‍या सामान्य भारतीय जनसमूहांचा आणि वर्गाचा आवाज बुलंद करण्यासाठी भाजप विरुद्ध भारतीय अर्थात सरकार विरुद्ध सर्व समाज या राजकीय मोहीमेची बैठक नुकतीच मुंबईत संपन्न झाली. लोकांचे दोस्त या लोकशाहीवादी संघटनेच्या पुढाकारातून मोहीमेची सुरुवात करण्यात आली आहे.

    सध्या बँकांवर राजरोसपणे दरोडे टाकून देशद्रोही फरार होत आहेत. तर सामान्य माणसाला घर किंवा उद्योगासाठी मामुली कर्ज मिळवतानाही जीवाचा आटापीटा करावा लागतोय. उलट नोटाबंदीच्या माध्यमातून त्याचेच पैसे काढायची त्याला चोरी झालीय. नाक्या-नाक्यावर बेरोजगारांच्या फौजा वाढू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप नाही आणि शेतकर्‍यांना हमीभाव नाही. त्यातच या प्रश्‍नांवर लोकांनी बोलू नये म्हणून महार विरुद्ध मराठा, ओबीसी विरुद्ध इतर, हिंदू विरुद्ध मुसलमान असा झगडा लावून देण्यात येत आहे. सत्ता राखण्यासाठी या विविध जातींच्या न्याय मागण्यांचा गैरवापर केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर ज्यांचा वापर सत्ता राखण्यासाठी केला जातोय, त्याच जाती एकत्र येऊन सत्ताधार्‍यांना सत्तेबाहेर खेचू शकतील असा लोकांच्या दोस्तांचा विश्‍वास आहे. त्याचबरोबर शेतकरी, कामगार, विद्यार्थी किंवा डॉक्टर्स, वकील, इंजिनीअर्स, पत्रकार तसेच व्यावसायिक भारतीयत्वच्या रक्षणासाठी केवळ भारतीय म्हणून लढा देतील असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

    सदर बैठकीला अनेकविध भारतीय जातींचे उदा. मराठा, महार, मांग, मराठी, मुसलमान, माळी, धनगर, चर्मकार प्रतिनिधी उपस्थित होते. अनेक संस्था-संघटनांचे कार्यकर्ते, पत्रकार, इंजिनीअर, डॉक्टर, विद्यार्थी नेते, वकील आदी व्यावसायिक मंडळीही आवर्जून उपस्थित होती. मुंबई, ठाणे, पालघर या पट्टयात सभा, बैठका घेऊन भाजप विरुद्ध भारतीय ही मोहीम तीव्र केली जाणार आहे. लोकांचे दोस्तच्या वतीने रवि भिलाणे, ज्ञानेश पाटील, बाळासाहेब उमाप, समीर अंतुले, मंगेशq साळवी, सुनंदा नेवसे, ममता अढांगळे, विनायक साळुंखे आदींनी या मोहीमेसाठी पुढाकार घेतला आहे.

    No comments